मडगाव पालिकेवर भाजपला नगराध्यक्ष निवडणे होणार सोपे
विशेष प्रतिनिधी /पणजी
गोवा नगरपालिका कायद्यात दुरुस्ती करणाऱया वटहुकुमावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी अखेर आपली मोहोर उमटवली. यामुळे आता मडगाव नगरपालिकेवर नवा नगराध्यक्ष निवडणे दिगंबर कामत भाजप गटाला सहज सोपे जाणार आहे.
मडगाव नगरपालिकेत दिगंबर कामत समर्थक नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवक मिळून पंचवीस सदस्यीय पालिकेत 15 जणांचा पाठिंबा मिळणार आहे. तरीदेखील घनश्याम शिरोडकर हे विरोधी पक्षाचे उमेदवार मडगावचे नगराध्यक्ष बनले होते. त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून त्यांना त्या पदावरून हटविण्यात आल्यानंतर भाजपकडे पूर्ण बहुमत आल्यानंतर देखील नूतन नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा घातपात होईल की काय, या भीतीने भाजपने नगरपालिकेच्या कायद्यातच दुरुस्ती करण्याचे ठरविले आहे.
सर्व मंत्र्यांनी दिली मान्यता
सध्या या कायद्यात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे. केवळ मडगावातील या प्रकारामुळे गुप्त मतदान झाल्यास ते सरकारच्या विरोधात जाऊ शकते, हे लक्षात घेऊन कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निणर्यानुसार राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांकडून (कॅबिनेट बाय सर्क्युलेशन) दुरुस्तीच्या सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर हा प्रस्ताव राज्यपाल पिल्लई यांचाकडे पाठविण्यात आला.
या दुरुस्ती कायद्याला काँगेस व गोवा फॉरवर्ड या दोन पक्षंानी जोरदार विरोध दर्शविला होता. हा विरोध मोडित काढून सरकारने कायद्यात दुरुस्ती केली व सायंकाळी जारी केलेल्या या वटहुकुमावर राज्यपाल पिल्लई यांनी आपली स्वाक्षरी केली. यामुळे आता राज्यातील नगराध्यक्ष आणि उप नगराध्यपदासाठीच्या निवडणुकीला गुप्त मतदानाऐवजी हात उंचावून मतदान करण्यास मान्यता मिळाली आहे. केवळ मडगाव पालिका आपल्या ताब्यात यावी, यासाठी सरकारने हा घाईघाईत हा निर्णय घेतलेला आहे.