प्रतिनिधी / सातारा :
पालिकेचा व्यापारी गाळा 11 वर्षांपासून भाड्याने देण्यात आल्याची माहिती पालिकेकडे नाही. चार गाळ्यांपैकी तीनच गाळे पालिकेने कागदावर कसे दाखवले. एक गाळा चित्रपटात विहिर चोरीला जाते, तसा गेला का काय?, जे प्लॅनमध्ये दाखवले आहे ,तसे का नाही. जीना का काढला, असा आरोप सत्ताधारी नगरसेवक वसंत लेवे व विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांनी करुन सत्ताधारी साविआला चांगलेच जेरीस आणले. दरम्यान, आरोग्य, बांधकाम, अतिक्रमण या विभागातील शकवरुन मोने यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. विषय पत्रिकेवर असलेल्या 58 विषयांपैकी 3 विषय नामंजूर करण्यात आले.
नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली सातारा पालिकेची ऑनलाईन सभा पार पडली. या सभेला उपाध्यक्ष मनोज शेंडे, विरोधी पक्ष नेते अशोक मोने, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगरसेवक धनंजय जांभळे, अविनाश कदम, सुनील काळेकर यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. सभेच्या सुरुवातीपासून अशोक मोने यांनी पालिकेच्या कार्य पद्धतीवरुन चांगलेच ताशेरे ओढले. शहरात वाढलेली अतिक्रमणांची बजबज पुरी कधी थांबणार, अतिक्रमण विभाग काम करतो आहे की नाही, अशा शब्दात त्यांनी फैलावर घेतले. लेखा विभागाने आरोग्य, बांधकाम, अतिक्रमण या विभागात शक ठेवले आहेत. त्यावरुन लेखाअधिकारी कल्याण पाटील यांना जाब विचारला. त्यानंतर स्थावरचा विषय वाचण्यापूर्वी गोडोलीतील उद्यानावर खर्चाचा मुद्दा आला तेव्हा अण्णा लेवे म्हणाले, गोडोली उद्यान कुठले आणि जिजाऊ उद्यान कुठले ते जरा सांगता का?, तर मोने यांनी 14 लाख 62 हजाराचा खर्च कशासाठी असा प्रश्न केला.