प्रतिनिधी / सातारा :
विद्यमान नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपत आलेला आहे. त्यामुळे विकास कामाच्या अनुषंगाने स्थायी सभा आणि सर्वसाधारण सभा घेण्यात याव्यात, अशी मागणी नविआकडून करण्यात आली होती. तसे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने सत्ताधारी साविआने हालचाली करुन अखेर स्थायी समितीच्या सभेचा मुहूर्त काढला आहे. आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडीत काढत अजेंडय़ावर 400 विषय घेतले आहेत. ही सभा मंगळवार दि. 14 रोजी स्थायी समितीच्या सभागृहात होणार आहे.
सातारा पालिकेमध्ये सत्तेत असलेल्या साविआकडून सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीची सभा काढल्या जात नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनीच आपल्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे नविआकडून करण्यात आली होती. निवेदनाच्या अनुषंगाने काही दिवसांमध्येच सातारा विकास आघाडीकडून हालचाली गतीमान होवून विषयपत्रिका काढण्यात आली अन् स्थायी समितीचा मुहूर्त ठरवण्यात आला. दि. 14 रोजी स्थायी समितीची सभा होत असून या सभेमध्ये तब्बल चारशे विषय घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये अगदी साधे साधे विषय सुद्धा आलेले असल्याने या विषयांची उपसूचना वाचणार की लगेच सत्ताधारी मंजूर करणार हे पहायला मिळणार आहे.