आखातमध्ये स्थित भारतीय उद्योजकाची घोषणा
तिरुवनंतपूरम / वृत्तसंस्था
आखातमध्ये स्थित असलेल्या भारतीय उद्योजकाने भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेशला 1 कोटी रुपयांचे इनाम दिले. भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकले, त्या मोहिमेत पीआर श्रीजेशचा सिंहाचा वाटा राहिला होता.
‘गोलरक्षक पीआर श्रीजेशने भारतीय संघाला कांस्य जिंकून देण्यात अतिशय मोलाचे योगदान दिले. त्या योगदानाचे महत्त्व लक्षात घेत आम्ही 1 कोटी रुपयांचे इनाम जाहीर करत आहोत’, असे व्हीपीएस हेल्थकेयरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. शमशीर वायलिल यांनी यावेळी ट्वीट केले.
भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाच्या प्ले-ऑफ लढतीत जर्मनीला 5-4 अशा निसटत्या फरकाने मात दिली होती. भारत अंतिम क्षणी 5-4 अशा फरकाने आघाडीवर असताना, जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. त्यावेळी गोलजाळय़ाचा वेध घेतल्यास बरोबरी प्राप्त करणे जर्मनीला शक्य होते. मात्र, पीआर श्रीजेशने तो कॉर्नर यशस्वीरित्या परतावून लावला आणि यामुळे भारताचे 41 वर्षांनंतरचे पदक निश्चित झाले होते.