ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली उच्च न्यायालयाने एका बलात्काराच्या खटल्यात दिलेल्या निर्णयावर मोठी चर्चा होऊ शकते. या प्रकरणातील पीडित महिलेच्या हातावर आरोपीच्या नावाचा टॅटू पाहून उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे. दुसऱ्या बाजूने विरोध झाल्यावर या प्रकारचा टॅटू जबरदस्तीने काढणे शक्य नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. आरोपीने जबरदस्तीने महिलेच्या हातावर स्वत:चे नाव गोंदवले होते, असा दावा पीडित महिलेने केला होता. मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळला आहे.
न्या. रजनीश भटनागर यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, माझ्या मते टॅटू काढणे ही एक कला आहे. त्यासाठी खास मशिनची आवश्यकता असते. त्याचबरोबर तक्रारदार महिलेच्या हातावर असलेला टॅटू काढणे इतकी सोपी गोष्ट नाही. हे कुणालाही जमेल असे काम नाही. हे फिर्यादी पक्षाचे काम नाही. याचिकाकर्त्याचाही टॅटू व्यवसायाशी कोणता संबंध नाही.’
दरम्यान, या प्रकरणातील याचिकाकर्त्या महिलेने आरोप केला होता की, आरोपीने तिला धमकी देऊन आणि ब्लॅकमेल करुन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. त्यांचे 2016 ते 2019 या काळात शारीरिक संबंध होते. त्यावर याचिकाकर्त्या महिलेेचे लग्न झाले होते तरीही ती आपल्यावर प्रेम करत होती. आमचे संबध असल्याचा तिचा दावा होता, असा युक्तीवाद आरोपी तरुणाने केला होता.
आमच्यामध्ये फेसबुकवर मैत्री झाली होती. त्यानंतर आम्ही अनेकदा एकत्र सेल्फी क्लिक केले आहेत, असा युक्तीवादही आरोपी तरुणाने केला. हा युक्तीवाद सादर करत असतानात तरुणाने न्यायालयात याचिकाकर्त्या महिलेच्या हातावरील टॅटूचे फोटो देखील दाखवले. त्यानंतर उच्च न्यायालयानं आरोपीला जामीन मंजूर केला आहे.