खैरवाड ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित : बेकवाड ग्रा. पं. गैरव्यवहार प्रकरण : विविध संघटनांचा आंदोलनकर्त्यांना पाठिंबा
बातमीदार /खानापूर
बेकवाड ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील खैरवाड येथे रोजगार हमी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी खानापूर तालुका पंचायतीसमोर सोमवारपासून छेडलेले आंदोलन दुसऱया दिवशीही कायम होते.
विविध संघटनांद्वारे मिळणारा पाठिंबा तसेच आंदोलनाची तीव्रता पाहून ता. पं. कार्यकारी अधिकाऱयांनी बेकवाड ग्रा.पं. पीडीओची बदली केल्याचा लेखी आदेश आंदोलनकर्त्यांच्या हाती सोपविला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी अट ठेवण्यात आली.
पाठिंब्याने आंदोलनाची धार तीव्र
सोमवारी सकाळी सुरू झालेले आंदोलन मंगळवारीही सुरू होते. दोन दिवसात विविध संघटना-संस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे माजी आमदार दिगंबर पाटील, भू-विकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, म. ए. समितीचे प्रकाश चव्हाण, यशवंत बिरजे, बाळासाहेब शेलार, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, मऱयाप्पा पाटील, विशाल पाटील यांनी तसेच मराठा परिषदेचे तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई, राजू कांबळे, ऍड. एच. एन. देसाई. शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील यांनी पाठिंबा दर्शविला. सदर प्रकरणाची ओंबूड्समननी चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
ओंबड्समनसमोर सुनावणीत पीडीओ बदलीचे आदेश जारी
ओंबूड्समनसमोर झालेल्या सुनावणीत तक्रारदारांच्यावतीने ऍड. आकाश अथणीकर यांनी बाजू मांडली. सदर कामात जेसीबी व इतर यंत्रांचा वापर झाल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेऊन खानापूर ता. पं. अधिकाऱयांना सध्या बेकवाड ग्रा.पं. पीडीओ बन्नी यांची बदली करण्यात यावी, असे सांगण्यात आले. त्यानुसार ता. पं. अधिकारी धारवाडकर यांनी बन्नी यांच्या बदलीचे आदेश जारी केले. पुढील तपासणी करून संबंधितांवर क्रम घेण्यात येतील, असे ओंबुड्समन यांनी सांगितले. यानंतर झुंजवाडकर यांनी गावकऱयांसह धरणे आंदोलन स्थगित केले.