कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे उघडकीस : नागरिक पाय अडकून पडण्याचे प्रकार
प्रतिनिधी / बेळगाव
नव्याने बांधलेल्या जुना धारवाड- पी. बी. रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावरील रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. या उड्डाणपुलावरील डांबर निघून गेल्याने लोखंडी पट्टय़ा दिसत आहेत. त्यामुळे कंत्राटदाराने या पुलाचे काम करताना निकृष्ट साहित्य वापरल्याचे दिसून येते.
काही वर्षांतच या नवीन उड्डाणपुलाची ही अवस्था झाली आहे. येथील रस्त्याचे बांधकाम करताना कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. शहराचा विकास करण्यासाठी कोटय़वधीचा निधी मंजूर होतो. मात्र कमी दर्जाचे साहित्य वापरल्याने दर दोन-तीन वर्षांनी पुन्हा रस्त्यासाठी निधी मंजूर होत असल्याने कंत्राटदाराने आपला मनमानीपणा सुरू ठेवल्याचे चित्र आहे. येथील फक्त उड्डाणपुलावर ही स्थिती नसून उड्डाणपुलाच्या खालील सर्व्हिस रोडवरदेखील अशीच परिस्थिती आहे. या रस्त्यावरील संपूर्ण डांबर जाऊन खडीचे साम्राज्य पसरले आहे. लोखंडी सळय़ाही बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणारे नागरिक पाय अडकून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांनामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.