युवराज पाटील /सांबरा
मूळचे मुचंडी, ता. बेळगाव येथील रहिवासी सध्या शिक्षण क्षेत्रात हुक्केरी तालुक्यातील हरगापूरगड सरकारी मराठी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे गणित शिक्षक पुंडलिक फकिरा कुंडेकर यांनी गणितातील 15 ची कसोटी आणि 20 ची कसोटी नुकतीच शोधून काढली आहे. त्यामुळे सध्या हा एक चर्चेचा विषय बनला असून त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या आधी गणितामध्ये 2 च्या कसोटीपासून ते 12 कसोटीपर्यंतच कसोटी उपलब्ध होत्या. या कसोटींचा उपयोग शालेय पातळीवर तसेच स्पर्धात्मक परीक्षेत खूप होतो. यापूर्वी 15 ची आणि 20 ची कसोटी उपलब्ध नव्हती, पण या कसोटीसाठी शोधत असताना त्यांना सततच्या अथक प्रयत्नामुळे धवल यश मिळाले आहे. या कसोटी शोधताना त्यांना या दोन्ही कसोटी शोधण्यात यश प्राप्त झाले. याबद्दल दैनिक तरुण भारतशी बोलताना ते म्हणाले की, मला खरोखर आत्मानंद मिळाला असून हे संशोधन कार्य केवळ माझे आध्यात्मिक महासद्गुरु परमाब्धिःकार प. पू. परमात्मराज महाराज यांच्या ज्ञानकृपा आशीर्वादाने साध्य झाले आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक
पुंडलिक फकिरा कुंडेकर यांनी सुरुवातीला मुचंडी येथील सिद्धारूढ हायस्कूलमध्ये सात वर्षे विनावेतन गणित शिक्षक म्हणून उत्तम कार्य केले आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याने अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मातोश्री कै. लक्ष्मीबाई फकिरा कुंडेकर यांच्या कष्टाची जाणीव ठेऊन अतिशय कठीण परिस्थितीत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांच्या आईने अज्ञानरुपी निद्रेतून सज्ञानरुपी ज्ञान जगात जगण्याचा त्यांना मार्ग दाखविला.
15 ची कसोटी अशी आहे की कोणत्याही संख्येच्या सुटे स्थानात 5 किंवा 0 यापैकी एखादा अंक असेल आणि त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज 3 च्या पटीत असेल तर त्या दिलेल्या संख्येला 15 ते निःशेष भाग जातो. उदा. 30, 60, 90, 120, 240, 360, 810, 840, 930, 1020, 975, 855, 135 इ.
तसेच 20 ची कसोटी अशी आहे की, कोणत्याही संख्येमध्ये दशक स्थानात 2 आणि सुटे स्थानात 0 असेल तर त्या संख्येला 20 ने निःशेष भाग जातो. उदा. 320, 5920, 6920, 7520 इ.या कसोटींचा वापरही निश्चितच गणितामध्ये होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.