गोकुळ शिरगाव / वार्ताहर
कणेरीवाडी (ता. करवीर) येथील हॉटेल पार्क इन येथे लग्नाच्या हळदी समारंभ कार्यक्रमा दरम्यान अज्ञात चोरट्या कडून ४२ ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा मोठा हार,२५ ग्रॅम वजनाचा एक लहान हार, ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान मंगळसूत्र, एक सोन्याचा बाजूबंद, सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, रोख रक्कम, दोन महागडे मोबाईल व सिम कार्ड असा सुमारे पाच लाख ५९ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून या बाबतची फिर्याद पिंपरी, पुणे येथे राहणाऱ्या विनीत कुटुंबीयांनी याबाबत गोकुळ शिरगाव पोलीसात वर्दी दिली आहे.
कुटुंबीय लग्नाच्या हळदी समारंभात व्यस्त असताना पाळत ठेवून लॉनमधील टेबलवरील पर्समध्ये ठेवलेल्या ऐवजसह पर्सही लंपास करीत चोरट्याने पोबारा केला. सदर चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. डी. गच्चे करीत आहेत.
हॉटेलमध्ये चोरीचे वाढते प्रमाण
गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हॉटेल मधून चोरी होण्याची अलीकडच्या काळातील ही दुसरी घटना असून मागील महिन्यात मेंढ्या खरेदीसाठी जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाडीतून जय हिंद हॉटेलमध्ये थांबले असता चोरी झाली होती. त्यानंतर आता पार्क इन हॉटेलमध्येही चोरी झाली असून यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.