ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरी डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. नव्या आदेशानुसार आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.
सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील. पुण्यात सध्या दुकाने सात वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट, बार 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी होती.
पुण्यात काय सुरु काय बंद :
- सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
- अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील.
- मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.
- रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.
- उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.
- खाजगी कार्यालये कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत. अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने.
- लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणे आवश्यक.
- अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी.
- पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी.
- कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.