पुणे /प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात शनिवार आणि रविवार दुकानं बंद राहणार असल्याची घोषणा केली. अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान यावेळी अजित पवार यांनी निर्बंध अजून कठोर करण्याचा इशारा देताना विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केलं जाईल असं सांगितलं. तसंच पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचं आवाहनही केलं आहे.
“कोरोना संकट हळूहळू कमी होत असलं तरीही आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी मिळून शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद राहतील असा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सोमवार ते शुक्रवारच दुकानं सुरु राहणार आहेत. परिस्थिती खूप बिघडली तर त्यात बदल करण्यात येईल. पुणेकरांना शनिवारी आणि रविवारी बंद का असा प्रश्न पडला असेल. कारण महाराष्ट्रात कोरोना कमी होऊ लागला असला तरी रायगड,रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर अशा काही ठिकाणी अद्याप कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.