राजकुमार हिरानी यांच्या आगामी चित्रपटात दिसणार
कुछ-कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, माय नेम इज खान आणि दिलवाले यासारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र दिसून आलेली शाहरुख आणि काजोल ही बॉलिवूडमधील सर्वात पसंतीची जोडी आहे. आता ही जोडी पुन्हा एकदा राजकुमार हिरानी यांच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिरानी लवकरच इमिग्रेशनवर चित्रपट तयार करणार असून यात शाहरुख खान स्थलांतरिच्या मुख्य भूमिकेत तर काजोल त्याच्या पत्नीच्या भूमिकेत असणार आहे. याचबरोबर चित्रपटात आणखीन काही मोठे कलाकार दिसून येणार आहेत.
शाहरुख खान साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे वृत्तांकन करणारी पत्रकार म्हणून या चित्रपटात तापसी पन्नू दिसून येणार आहे. तर विद्या बालन देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असल्याचे समजते.
शाहरुखसोबत चित्रपटासाठी करार करण्यात आला आहे. तर उर्वरित तिन्ही कलाकारांसोबत अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे. कलाकारांच निवड पूर्ण झाल्यावर निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती राजकुमार हिरानी आणि शाहरुखची रेड चिली प्रॉडक्शन कंपनीकडून केली जात आहे. एप्रिल 2022 पर्यंत या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले जाणार आहे. तर शांतनू मोइत्रा हे याचे संगीत दिग्दर्शक असतील. तर स्वानंद किरकिरे यांच्याकडून गीतलेखन होणार आहे.