प्रतिनिधी/ मडगाव
सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांचे ‘सेटिंग’ न झाल्यामुळेच सांगे येथे आयआयटी प्रकल्पाला जमीन मिळू शकली नाही आणि हा प्रकल्प सत्तरीत गेला असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जे वक्तव्य केले आहे ते धक्कादायक असून त्यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱया एका आमदारांवर त्यांनी हा आरोप केला आहे. त्यामुळे आमदार गावकर यांना लोकांना उत्तर देऊन खरी गोष्ट काय याचा खुलासा करावा लागेल, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. हे पूर्ण सरकारच ‘सेटिंगवाल्यां’चे असल्याची कबुलीच मुख्यमंत्री सावंत यांनी दिली आहे, असेही सरदेसाई यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी जो आरोप केला आहे तो केवळ सांगेच्या आमदारांचा अपमान नसून त्यांना जिंकून आणणाऱया तमाम स्वाभिमानी सांगेकरांचा अपमान आहे. त्यामुळे आता या आरोपाला उत्तर देणे ही गावकर यांची जबाबदारी आहे. आमदार गावकर हे सक्रिय आहेत की झोपलेले आहेत हे आता त्यांच्या पुढील कृतीतून दिसेल. जर ते झोपलेले असतील, तर सांगेच्या लोकांनी त्यांना जागे करण्याची गरज आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हे पूर्ण सरकारच ‘सेटिंगवाल्यां’चे असल्याची कबुलीच मुख्यमंत्री सावंत यांनी दिली आहे. रेल्वेमार्ग दुपदरीकरण प्रकल्प असो, म्हादईचे पाणी वळविणे असो, मोलेतील विद्युत प्रकल्प असो, सगळय़ाच ठिकाणी सरकारचे आणि सरकारला पाठिंबा देणाऱयांचे सेटिंग चालू असून सध्या या सरकारने गोवा ‘फास्ट ट्रक’ विक्रीवर काढला आहे. यामुळेच या सरकारवर लोक विश्वास ठेवत नाहीत, अशी टीका सरदेसाई यांनी शेवटी केली आहे.