भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप
प्रतिनिधी / कराड
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गेल्या वर्षी आयकर विभागाने नोटीस दिली होती. आता मला ऐन दिवाळीत नोटीस बजावली आहे. मागील दहा वर्षातील संपत्तीचे विवरण द्यावे अशी नोटीस असून सत्तेचा वापर कसा व कोणासाठी करावा हे भाजपाने दाखवून दिल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
कराड येथे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, आयकर विभागाची नोटीस आली असून खुलासा करण्यासाठी 21 दिवसांची मुदत दिली आहे. खुलासा करण्यासाठी मी स्वता हजर राहावे असा उल्लेख नोटीसमध्ये आहे. आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर त्याबाबत योग्य ती कार्यवाही आम्ही सुरू केली आहे. चव्हाण म्हणाले, बिहार निवडणुकीत भाजपाने नितीशकुमार यांची राजकीय कारकिर्द संपवण्यासाठी डावपेच केले.
चिराग पासवानच्या नेतृत्वाला भाजपनेच खतपाणी घालून मोठे केले. त्यामुळेच नितीशकुमार यांना फटका बसला हे सरळ आहे. नितीशकुमार यांची ताकद कमी करण्याचा हा डाव होता. बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार यांना भाजपने संपविण्याचा कट निश्चित केला आहे. त्याची उदाहरणेही समोर आहे. कारण पासवान यांनी भाजपच्या नव्हे तर नितीशकुमार यांच्या पक्षाच्या विरोधात उमेदवार उभे केले. त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट आहेत.