मुंबई / वृत्तसंस्था
मागील आयपीएल हंगामात युवा फलंदाज पृथ्वी शॉ अतिशय खराब फॉर्ममध्ये होता. वास्तविक, अशा बॅड पॅचमधून मार्गोत्क्रमण करत असताना त्या फलंदाजाने सरावावर अधिक भर देणे, अधिक मेहनत घेणे अपेक्षित असते. दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना मात्र मागील हंगामात आश्चर्यकारक अनुभव आला. कारण, खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वी शॉने त्यावेळी सामन्यात धावा होत नसल्याने चक्क सराव करणेच टाळले होते.
त्या आठवणीला उजाळा देताना पाँटिंग म्हणाला, ‘माझ्यासाठी तो मोठा धक्का होता. कारण, शॉ जर धावा होत असतील तरच जास्त सराव करत असे. पण, लवकर बाद व्हावे लागले तर तो चक्क फलंदाजीच्या सरावालाच दांडी मारत असे. त्यावेळी 4 ते 5 सामन्यात तो 10 पेक्षा कमी धावांवर बाद झाला. मी त्यावेळी त्याला सरावावर भर देण्याची सूचना केली. पण, तो चक्क स्पष्ट नकार देत असे. आता त्याच्या या सवयीत बदल झाला असेल, अशी माझी अपेक्षा आहे’.
मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग दि. 29 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल झाला असून त्यापूर्वी त्याने 7 दिवसांचे सक्तीचे क्वारन्टाईन पूर्ण केले. पृथ्वी शॉ येथे दाखल होण्यापूर्वी उत्तम बहरात राहिला आहे. अलीकडेच त्याने विजय हजारे चषक स्पर्धेत 4 शतके झळकावली. शिवाय, तो स्पर्धेत सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी राहिला आहे.