100 चेंडूत 150 धावांची वादळी खेळी
वृत्तसंस्था/ लिनकॉईन
न्यूझीलंड दौऱयावर असलेल्या भारत अ संघाने दुसऱया सराव सामन्यात शानदार विजय संपादन केला. दुखापतीमधून सावरत संघात पुनरागमन केलेल्या पृथ्वी शॉचे धडाकेबाज दीडशतक आणि गोलंदाजीत इशान पोरेल-कृणाल पंडय़ा यांच्या भेदक माऱयाच्या जोरावर भारताने या सामन्यात 12 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाचा डाव 372 धावांवर आटोपला. यानंतर, विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान न्यूझीलंड अ संघाला 360 धावा करता आल्या. आता, उभय संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला दि. 22 पासून सुरुवात होईल.
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱया भारताने सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल यांनी पहिल्या गडय़ासाठी 89 धावा जोडल्या. मयांक माघारी परतल्यानंतर पृथ्वी शॉने कर्णधार शुभमन गिलच्या साथीने संघाचा डाव सावरला. मात्र ठराविक अंतराने गिल (24) आणि सूर्यकुमार यादवला (26) माघारी धाडण्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश आले.
पृथ्वी शॉ चे धडकेबाज दीडशतक
पृथ्वी शॉने एका बाजूने किल्ला लढवताना शतकी खेळी साकारली. 100 चेंडूत 22 चौकार आणि 2 षटकारासह पृथ्वीने 150 धावा फटकावल्या. फटकेबाजीच्या प्रयत्नात तो गिब्सनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर विजय शंकरने (41 चेंडूत 6 चौकारासह 58) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 50 षटकांत 372 धावापर्यंत मजल मारली. कृणाल पंडय़ाने 32 तर अक्षर पटेलने 15 धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरादाखल, न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर केटन क्लार्क स्वस्तात माघारी परतला. पाठोपाठ जोश क्लार्कसनही माघारी परतल्यामुळे न्यूझीलंडची 2 बाद 27 अशी स्थिती झाली होती. मात्र यानंतर, जॅक बॉयल आणि फिन अ?Ÿलन यांनी 144 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. बॉयलने 17 चौकारासह 130 धावा केल्या तर ऍलनने 87 धावांचे योगदान दिले. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर इतर फलंदाजांना मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात अपयश आले. किवीज संघाला 6 बाद 360 धावा करता आल्या. भारतीय संघाने हा सामना 12 धावांनी जिंकला.
संक्षिप्त धावफलक : भारत अ 49.2 षटकांत सर्वबाद 372 (पृथ्वी शॉ 150, विजय शंकर 58, कृणाल पंडय़ा 32, मयांक अगरवाल 32, शुभमान गिल 24, सुर्यकुमार यादव 26, मिचेल 3/37, गिब्सन 2/72).
न्यूझीलंड अ 50 षटकांत 6 बाद 360 (बॉयल 130, ऍलन 87, क्लेवर नाबाद 44, इशान पोरेल 2/59, कृणाल पंडय़ा 2/57, अक्षर पटेल 1/66).