वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा पॅराऍथलीट शरद कुमार याने कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या प्रतिबंध कार्यासाठी पंतप्रधान मदतनिधी म्हणून एक लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
बिहारचा 29 वर्षीय अपंग ऍथलीट तसेच आशियाई पॅरा क्रीडास्पर्धेत उंचउडीत दुहेरी विजेतेपद मिळविणाऱया शरद कुमारने आपल्या टिव्टरवर ही माहिती दिली आहे. कोव्हिड-19 च्या जलद प्रसारामुळे देशामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे असेही त्याने म्हटले आहे. पंतप्रधान मदतनिधीसाठी मी एक लाख, एक रूपया निधी देत आहे, असे शरद कुमारने सांगितले. 2014 च्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धेत टी-44 गटात उंचउडी या प्रकारामध्ये तसेच 2018 च्या जकार्ता येथील आशियाई स्पर्धेत त्याने टी-42-63 या प्रकारात शरद कुमारने सुवर्णपदक मिळविले होते. 2017 साली आयपीसी विश्व स्पर्धेत त्याने रौप्यपदक मिळविले होते.