नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली इंधन दरवाढ थांबताना दिसत नाही. रविवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 24 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 27 पैशांची वाढ दिसून आली. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलच्या दराने 99 रुपये प्रतिलिटरपर्यंत मजल मारली आहे. दिल्लीतही पेट्रोलने 92.58 तर डिझेलने 83.22 रुपये प्रतिलिटर अशी उच्चांकी पातळी गाठली आहे. मुंबईत डिझेलने नव्वदी पार केली असून रविवारी 90.40 रुपये प्रतिलिटर दराने विक्री केली जात होती. महाराष्ट्रातील परभणीसह राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये पेट्रोल दराने मागील आठवडय़ातच ‘शंभरी’पार झेप घेतली आहे.