नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तेल निर्यात करणाऱया देशांच्या संघटनेने (ओपेक) आणि भागीदार देशांनी हळूहळू तेलाचे उत्पादन वाढविण्यास सहमती दर्शविली आहे. ‘ओपेक’च्या या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलचे आवाक्याबाहेर वाढलेले दर नियंत्रणात येण्याचे संकेत शनिवारी मिळाले. तेल कंपन्यांनी मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत थोडय़ा प्रमाणात कपात केली होती. परंतु मुळातच किंमती शंभरीजवळ पोहोचल्याने सर्वसामान्यांना अजूनही म्हणावा तसा दिलासा मिळालेला नाही. आता तेल उत्पादन पूर्वपदावर आल्यानंतर येत्या एक-दोन महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर बऱयापैकी कमी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मे ते जुलै या काळात दररोज तेलाचे दोन दशलक्ष बॅरल्स उत्पादन वाढविण्याचा निर्णय तेल उत्पादक देशांनी घेतला आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला सावरताना आम्ही ही पावले उचलत आहोत असे ‘ओपेक’चे म्हणणे आहे. ‘ओपेक’ देशांनी उत्पादन कमी केल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ‘ओपेक’ मे महिन्यात तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन 3.5 लाख बॅरल, जूनमध्ये देखील दररोज 3.5 लाख बॅरल आणि जुलैमध्ये 4 लाख बॅरलची वाढ करणार आहे. तसेच सौदी अरेबियाही दररोज 10 लाख बॅरलचे अतिरिक्त उत्पादन करणार आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे किंमती खाली येतील, ज्याचा थेट परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या बाबतीत भारत मुख्यतः इतर देशांच्या आयातीवर अवलंबून आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर 64 डॉलरच्या आसपास आहेत.