नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सुरू झालेली इंधन दरवाढ सलग तिसऱया दिवशीही पाहायला मिळाली. गुरुवारी पेट्रोलचे दर 25 पैशांनी तर डिझेलचे दर 30 पैशांनी वाढले. नव्या दरवाढीनुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.99 रु. आणि डिझेलची किंमत 81.42 रुपयांवर पोहोचली. मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळूरमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे अनुक्रमे 97.34, 92.90, 91.14, 94.01 रुपये झाले आहेत. तर डिझेलचे दर प्रतिलिटर अनुक्रमे 88.49, 86.35, 84.26, 86.31 रुपये पर्यंत पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ कायम आहे. मंगळवारी कच्च्या तेलाचे दर सात आठवडय़ांतील सर्वाधिक उंचीवर पोहोचले होते. परंतु अनेक राज्यांमध्ये असणाऱया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नव्हते. पण, मागच्या तीन दिवसांपासून इंधन दरवाढ सुरूच असून, पेट्रोल 62 पैसे आणि डिझेल 69 पैशांनी महाग झाले आहे.