गुजरात निवडणुकीची पार्श्वभूमी ः आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरले कच्च्या तेलाचे दर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पेट्रोल-डिझेल दराप्रकरणी सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आगामी अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. अशा स्थितीत तेल विपणन कंपन्यांना पेट्रोल-डिझेल विक्रीतून नफा प्राप्त होत आहे. परंतु हा नफा मागील नुकसानीची भरपाई करण्यासाठी वर्ग केला जात असल्याचे मानले जात आहे.
तेल विपणन कंपन्यांनी दीर्घकाळपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत, या दरांमुळे या कंपन्यांना मोठे नुकसान देखील झाले आहे. परंतु आता पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून होत असलेल्या लाभाचा काही हिस्सा आता सर्वसामान्यांना दिलासा करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
पेट्रोलवर सध्या कंपन्यांना सुमारे 6 रुपये प्रतिलिटरचा सरप्लस मिळत आहे. अशा स्थितीत कंपन्यांना याचा दर कमी करणे शक्य झाले आहे. परंतु मागील नुकसानीची भरपाई करण्यासाठी तेल विपणन कंपन्या पूर्ण लाभ ग्राहकांना देणे टाळत आहेत, पण यातील काही हिस्सा सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी वापरला जाऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तेल विपणन कंपन्यांकडून अडीच रुपये प्रतिलिटरपर्यंत दिलासा देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
रशियाकडून स्वस्त दरात पुरवठा
भारताने चालू वर्षात रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढविली आहे. रशिया-युक्रेन युद्धापूर्वी भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीत रशियाची हिस्सेदारी 2 टक्के देखील नव्हती. परंतु आता हे प्रमाण 20 टक्क्यांच्या समीप पोहोचले आहे. मागील महिन्यात पहिल्यांदाच भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱया देशांच्या यादीत रशियाने इराक आणि सौदी अरेबिया यासारख्या देशांना मागे टाकून पहिले स्थान मिळविले. आंतरराष्ट्रीय दरांच्या तुलनेत रशियाकडून सवलतीच्या दरात भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे.
इराकवरील दबाव वाढला
रशियाकडून कच्च्या तेलाची आयात भारताने वाढविल्यावर इराकवरील दबाव वाढला आहे. यामुळे इराकने स्वतःच्या कच्च्या तेलाचे दर भारतासाठी काही प्रमाणात कमी केले आहेत. काही प्रकारचे कच्चे तेल इराककडून रशियापेक्षाही कमी दरात भारताला पुरविण्यात येत आहे. याचमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात 100 डॉलर्स प्रतिबॅरलवर मिळणारे कच्चे तेल भारताला 75-80 डॉलर्स प्रतिबॅरलच्या आसपास दरात मिळत आहे.