पेठ वडगाव / प्रतिनिधी
वडगाव नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी दशरथ भैरू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पन्नास वर्षात कधीही न देण्यात आलेली स्वीकृत नगरसेवक पदाची संधी पेठ वडगाव येथील मंगरायाचीवाडी भागास पालिकेच्या सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीने प्रथमच दिल्याने मंगरायाचीवाडी भागातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. निवडीनंतर नूतन नगरसेवक पाटील यांचा सत्कार महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, संघटक अजय थोरात, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण व सर्व नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आला.
पेठ वडगाव पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दीपक खरोशे यांनी त्यांना दिलेला कार्यकाल संपल्यानंतर दिला होता. यामुळे स्वीकृत नगरसेवक पद रिक्त झाले होते. या पदासाठी सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी युवक क्रांती महाआघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले दशरथ पाटील यांचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी इचलकरंजी यांच्याकडे सादर केला होता. प्रांताधिकारी यांनी याची छाननी करून दशरथ पाटील यांचे शिफारस पत्र पालिकेकडे सादर केले. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घेण्यात आलेल्या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते.
ही निवड बिनविरोध करण्यात आली. या निवड कार्यक्रमाच्या सभेत युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, नगरसेवक अजय थोरात, संतोष गाताडे, शरद पाटील, नगरसेविका सुनिता पोळ, शबनम मोमीन, अलका गुरव, सावित्री घोटणे, नम्रता ताईगडे, मैमुन कवठेकर आदीनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सहभागी झाले होते.
स्वीकृत नगरसेवक पदावर प्रथमच मंगरायाचीवाडी भागास संधी मिळाल्याबद्दल या भागातील कार्यकर्त्यांनी निवडीनंतर फटाक्याची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला. निवडीनंतर नूतन सदस्य दशरथ पाटील यांनी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व मार्गदर्शक नेते, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले.