खंडपीठाचा सरकारला सवाल उत्तरासाठी 15 दिवसांची मुदत
प्रतिनिधी / पणजी
पेडणे येथे होऊ घातलेल्या घन कचरा प्रकल्पाचे पुढे काय झाले याची विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने केली असून उत्तर देण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदत दिली आहे. या प्रकल्पासाठी जेवढय़ा मान्यता थकित आहेत त्यावर जलद गतीने निर्णय घ्यावा, असा आदेश खंडपीठाने दिला आहे.
पेडणे येथे सुमारे 3 कोटी 25 लाख रूपये खर्च करून घन कचरा प्रकल्प स्थापण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री फ्रांसिस्क डिसौझा यांच्या हस्ते 18 जानेवारी 2013 रोजी त्याचे उद्घाटन झाले होते.
यंत्रणा आहे, पण कर्मचारीनाही
या प्रकल्पासाठी मोठी अवजड महागडी यंत्रे बसवण्यात आली आहेत पण ती चालवण्यासाठी लागणाऱया कर्मचाऱयांची भरती अजून करण्यात आलेली नाही. एकूण 29 हजार चौ.मी. जमीन या प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. सदर प्रकल्प सुरू झालाच नाही पण प्लास्टिक कचऱयापासून इंधन तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला. दि. 8 जून 2016 मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती.
तामिळनाडू येथील एम. के. एरोमेटिक ली नामक अस्थापनाला कंत्राट देण्यात आले आहे. गेली साडेतीन वर्षे सदर प्रकल्प खितपत पडला आहे. सदर प्रकल्प सुरू करण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिल्याचे मंडळाचे वकील जे. गुदिन्हो यांनी खंडपीठाला कळविले आहे.
पंधरा दिवसांता सर्व परवाने द्यावेत
एम. के. एरोमेटिक ली. या अस्थापनाच्यावतीने आता खंडपीठासमोर अर्ज सादर करण्यात आला असून अग्निशामक दल तसेच इतर अधिकारणी ना हरकत द्यायला तयार नसून त्यांच्याकडे अर्ज खितपत पडले आहेत. जोपर्यंत या मान्यता मिळत नाहीत, तोपर्यंत सदर इंधन प्रकल्प सुरू कसा करायचा असा प्रश्न सदर अस्थापनाचे वकील श्रीमती शलाखा शेळके यांनी उपस्थित केला. अग्निशामक दल आणि इतर संबंधित आस्थापनांनी आवश्यक ती मान्यता व ना हरकत दाखले लवकरात लवकर द्यावे व सरकारने 15 दिवसांच्या आत खंडपीठासमोर योग्य ते स्पष्टीकरण द्यावे असा आदेश न्या. महेश सोनक व न्या. एम. एस. जवळकर यांनी दिला आहे. पुढील सुनावणी दि. 3 मे 2021 रोजी ठेवण्यात आली आहे.
प्रकल्पाला रोज 10 टन प्लास्टिक आवश्यक
पेडणे येथील या प्रकल्पासाठी रोज 10 टन प्लास्टिक कचरा लागणार आहे. त्यापासून रोज 6.7 टन फर्नेस ऑईल तयार केली जाईल. हे वंगण, बार्ज व जहाजावर इंधन म्हणून वापरणे शक्य होणार आहे. त्या व्यतिरिक्त 500 किलो मेण (व्हॅक्स) तयार होणार आहे. उर्वरीत कचरा सिमेंट तयार करणाऱया पॅक्टरीसाठी उपयोगात येणार आहे.