नगरसेवक महेश आमोणकर यांचा पालिकेवर मोर्चा नेण्याचा इशारा
प्रतिनिधी /मडगाव
पेडा-खारेबांद येथे बेकायदा भंगारअड्डा सुरू असून त्यामुळे स्थानिकांना अडचणींचा सामना तसेच त्रास सहन करावे लागत असल्याची तक्रार पालिकेच्या मुख्याधिकाऱयांकडे करून महिना झाला, तरी कोणतीही कारवाई होत नसल्याने स्थानिक नगरसेवक महेश आमोणकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आपण पुन्हा फर्नांडिस यांना यासंदर्भात स्मरणपत्र दिले असून आठवडाभरात आवश्यक कारवाई न केल्यास पालिकेवर मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा आमोणकर यांनी दिला आहे.
कदंब बसस्थानकाच्या नजीक उभा राहिलेला बेकायदा गाडा मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी नगरसेवक जॉनी क्रास्टो यांच्या सांगण्यावरून एका दिवसात हटविला. अशी तत्परता मुख्याधिकारी बेकायदा गोष्टी व समस्यांचे आगार असलेला भंगारअड्डा हटविण्याच्या बाबतीत का दाखवत नाहीत, असा सवाल नगरसेवक आमोणकर यांनी उपस्थित केला आहे.
सदर भंगारअड्डय़ाच्या परिसरात खिळे, फुटलेल्या बाटल्यांच्या काचा, लोखंडी सळय़ा विखुरल्या जात असतात. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या टायरमध्ये त्या घुसून टायर पंक्चर होण्याचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. तसेच भंगारअड्डय़ाच्या नजीकच बाणावली, वार्का, केळशी भागांतील लोक कचरा टाकून देत असल्याचे आढळून येत आहे, असा दावाही त्यांनी केला. येथे गुरे व भटकी कुत्री कचऱयातील खाद्य शोधण्यासाठी धावून येत असल्याने समस्येत भर पडली आहे, अशी कैफियत नगरसेवक आमोणकर आणि स्थानिकांकडून मांडण्यात आली आहे. पालिकेकडून भरवस्तीत असा भंगारअड्डा उभारण्यासाठी परवानगी कशी काय दिली गेली असा सवालही त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.
हा भंगारअड्डा प्रभाग 13, 15 आणि 16 च्या रहिवाशांसाठी समस्या बनली आहे. मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी स्वतः सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी करावी व आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी आपण त्यांच्याकडे वारंवार करत आलो आहोत. तरीही ते का चालढकल करत आहेत ते कळू शकलेले नाही. यासंदर्भातील तक्रारवजा पत्राच्या प्रती नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, उपनगराध्यक्षा दिपाली सावळ तसेच मडगाव पोलीस निरीक्षक आणि अन्य संबंधित अधिकारिणींच्या प्रमुखांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी याकामी सहकार्य करावे, अशी मागणी नगरसेवक आमोणकर यांनी केली आहे.