तुळस गावातील युवक इंडियन नेव्हीमध्ये ग्राफिक डिझायनर : व्यावसायिक शिक्षणातून केले करिअर
भरत सातोस्कर / वेंगुर्ले:
अंगीभूत कलागुण ओळखून कला शिक्षकाने पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी दिलेला सल्ला व केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्याला परिपूर्ण शिक्षण व उज्ज्वल आयुष्यासाठी देणारे ठरले. तुळस-पांडेपरबवाडी येथील हेमंत दिलीप परब (32) या युवकास लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यानंतर त्याने बॅचलर ऑफ फाइन आर्टची पदवी घेतली. आज हा युवक इंडियन नेव्हीमध्ये युद्धनौकांवर आर्टिस्ट म्हणून काम करीत आहे. आपले गुरू कलाशिक्षक ऍन्थोनी डिसोजा यांनी आपल्याला घडविल्याची प्रामाणिक कबुलीही त्याने दिली. हेमंत परब याचे आई-वडील हे तुळस या गावी मूळ घरी राहतात, तर पत्नी व मुलगा कर्नाटक येथे राहतात.
हेमंत परब याचे माध्यमिक शिक्षण तुळस येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी हायस्कूलमध्ये झाले. या स्कूलमध्ये कलाशिक्षक ऍन्थेनी डिसोझा यांनी हेमंत परब याच्यामधील चित्रकला व हार्मोनियम या कलागुणांची पारख करीत त्यात शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षांना खास करून बसवले होते. या दोन्ही परीक्षेत त्याने प्राविण्य मिळवले होते. त्यानंतर अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात घेतल्यानंतर त्यास बॅचलर ऑफ फाइन आर्ट या पदवी शिक्षणासाठी सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेजला शिक्षक डिसोजा व रामकृष्ण देसाई सर यांनी ऍडमिशन मिळवून दिले. बॅचलर ऑफ फाइन आर्ट ही पदवीप्राप्त केल्यानंतर सहा महिन्यातच भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत कुडाळ येथे सुरू असलेल्या कॉनबॅक या बांबू प्रोसेसिंग संस्थेत ग्राफिक डिझायनर म्हणून 2010-11 मध्ये त्याला काम मिळाले. यात सुमारे एक वर्षभर काम केल्यानंतर मिळालेल्या अनुभवाचा दाखल्यावर गोव्यातील एका एजन्सीचे काम त्यांनी दोन वर्षे काम केले.
फिल्मसिटीत काम करण्याचीही मिळाली संधी
तुळस गावातील सुपुत्र व मुंबई प्रभादेवी येथील थर्माकोल डेकोरेटर शशिकांत उर्फ बाबू आरावंदेकर व जयवंत वायंगणकर यांच्याकडे मुंबई येथे थर्माकोल डेकोरेटर्सचेही काम काही दिवस केले. त्यांची ओळख फिल्मसिटीत असल्याने त्यांच्या ओळखीने सुप्रसिद्ध आर्ट डायरेक्टर दिलीप मोरे, महेश साळगावकर व मनोहर जाधव या प्रख्यात कला दिग्दर्शकांकडे असिस्टंट म्हणून काम केले. 2013 मध्ये ‘दुनियादारी’ हा चित्रपट हेमंतसाठी महत्त्वाचा ठरला. त्यानंतर फिल्मसिटीमध्ये भरपूर कामे मिळू लागली. दिलीप मोरे यांच्यासोबत फिल्मसिटीत हॉलिवूड चित्रपटासाठी ग्राफिक डिझायनर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
चित्रकला, हार्मोनियम वादन व फोटोग्राफीचा छंद
चित्रकलेबरोबरच हार्मोनियम वादनाचा हेमंत परबला छंद होता. त्याने विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन बक्षिसेही मिळवली आहेत. सिंथेसायझर वादन तसेच फोटोग्राफीचा छंदहे जोपासत त्यातून उत्कृष्ट फोटोग्राफी साकारली आहे.
कॅनव्हास पेटिंग व लोगो डिझाईनची कामे
हेमंत जेव्हा सुट्टीवर गावी येतो, तेव्हा गावात व अन्य ठिकाणी आपल्या अंगातील कलागुणांना तेज देण्यासाठी वॉल पेंटिंग, पेन्सिल स्केच व कॅनव्हास पेंटिंग अशा प्रकारची वेगवेगळी आर्टिफिशियल कामे ते करतो. वॉल पेंटिंगचे काम त्यांनी तुळस येथील जानकी चायनीज सेंटर व उत्सव हॉटेलमध्ये केले आहे. तसेच लोगो डिझाईनही तो करतो.
कलाशिक्षक ऍन्थोनी डिसोजांचे रेखाटले पहिले चित्र
पेन्सिल स्केजच्या माध्यमातून जी व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. यामध्ये सर्वप्रथम आपले गुरु, कलाशिक्षक ऍन्थोनी डिसोजा यांचे पेन्सिल स्केच काढून ते त्यांना प्रदान केले आहे. तसेच तुळस सरपंच शंकर घारे यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींची पेन्सिलस्केच त्याने बनविले आहे.
कला ग्रेड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक!
बीएफए या पदवी कोर्सच्या ऍडमिशनसाठी आठवी व नववीमध्ये घेतल्या जाणाऱया चित्रकला ग्रेड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यावरच बी. एफ. ए. या पदवी कोर्ससाठी कॉलेजची ऍडमिशन मिळते, असे परब याने सांगितले.
लग्नपत्रिकेचे सर्वत्र कौतुक
हेमंत परब याने आपल्या ग्राफिक डिझायनर या पदवीच्या माध्यमातून आपल्या लग्नाची लग्नपत्रिका आगळी-वेगळी अशी बनविली. दैनिकात जाहिरातीसह हेडलाईन व मजकूर स्वरुपात बातमी स्टाईलने त्यांनी आपल्या लग्नाची बनविलेली लग्नपत्रिका ही आकर्षक व वैशिष्टय़पूर्ण ठरली. या लग्नपत्रिकेचे त्यावेळी केवळ वेंगुर्ल्यातीलच नव्हे, तर जिल्हय़ात हजारो लोकांनी कौतुक केले. ग्राफिक डिझायनिंग करण्यासाठी संगणकीय ज्ञान (डिजिटल ग्राफिक आर्ट) यासाठी सावंतवाडी येथील प्रणव रमेश कासकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कोकणच्या सुपुत्रांच्या कलागुणांना वाव मिळाल्यास कोकणातील या हिऱयांना आपल्या राज्यात वा देशात स्वत:चे भविष्य स्वबळावर साकारता येणारे आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांतील कलागुणांना प्रोत्साहन देत व्यावसायिक शिक्षण देणे ही काळाची गरज ठरेल. यात शंकाच नाही, असे मत या युवकास घडविण्याचे प्रमाणिक प्रयत्न करणारे कलाशिक्षक ऍन्थोनी डिसोजा यांनी व्यक्त केले आहे.
कलेमुळे साकारले नेव्हीत नोकरी करण्याचे स्वप्न
हॉलिवूड चित्रपटासाठी करताना 2014 मध्ये पूर्वी नेव्हीमध्ये नोकरीसाठी केलेल्या ऍप्लिकेशननुसार कॉल लेटर आले. सहा महिन्यांत मुंबई-कुलाबा-नेव्हीनगर येथे नोकरीवर हजर झाले. नेव्हीने दिलेल्या प्रशिक्षणानुसार बोटीवर पेंटर म्हणून नियुक्ती झाली आहे. भारतातील अनेक मोठय़ा युद्धनौकांच्या आर्टसंदर्भातील कामे करण्यात आपला सहभाग असल्याचे हेमंत यांनी स्पष्ट केले.