विद्यापीठातील खाजगी कंपनींच्या सुरक्षा रक्षकांचा सवाल
प्रतिनिधी / कोल्हापूर
नोकरभरती बंदीमुळे शिवाजी विद्यापीठाची सुरक्षा खाजगी सुरक्षकांच्या हाती आहे. या खाजगी सुरक्षा रक्षकांना अकरा हजार रूपये पगार ठरला असून पीएफ फंडासाठी यातील अडीज हजार रूपये कट करून साडेआठ हजार रूपये त्यांच्या हातात पडतात. कोणतीही पेमेंट स्लीप नसताना फंडाचे पैसे जातात कोठे, असा सवाल सुरक्षा रक्षकांनी आपल्या आंदोलनात उपस्थित केला.
शिवाजी विद्यापीठ परिसरातील सुरक्षेचा ठेका एका खाजगी कंपनीला दिला अहे. या खाजगी कंपनीकडून दोन महिन्यातून एकदा पगार दिला जातो. तसेच पीएफसाठी अडीज हजार रूपये कट करून घेतले जातात. पैसे कट करून घेतले जातात, परंतू सुरक्षा रक्षकांना युव्हीएन नंबर, ईएसआय कार्डदेखील दिलेले नाही. त्यामुळे विद्यापीठातील खाजगी सुरक्षा रक्षकांनी आपल्या हक्कासाठी बुधवारी रात्री 12 बाराच्या शिफ्टमध्ये काम बंद आंदोलन केले. परंतू विद्यापीठ प्रशासनाने हस्तक्षेप करीत आंदोलन स्थगीत केले. तसेच संबंधीत कंपनीलाही सुरक्षा रक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या सुचना दिल्या आहेत.
कंपनीनी या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न सोडवावा
विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेचा स्टेड फास्ट सिक्युरिटी ऍन्ड सेफ्टी सोल्युशन कंपनीला ठेका दिला आहे. या कंपनीच्या कर्मचाऱयांच्या मागण्यासंदर्भात संबंधीत कंपनीने तोडगा काढावा. विद्यापीठाशी याचा काहीही संबंध नाही.
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर (शिवाजी विद्यापीठ)
सुरक्षा रक्षकांबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवला
सुरक्षा रक्षकांनी काही कालावधीपुरते आंदोलन केले होते. परंतू सुरक्षा रक्षकांबरोबर चर्चा करून पीएफ, ईएसआयएसचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षक कामावर रूजू झाले आहेत. रेश्मा कडू (स्टेड फास्ट सिक्युरिटी ऍन्ड सेफ्टी सोल्युशन कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधी)