शिमोगा जिल्हय़ात पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण
प्रतिनिधी / बेंगळूर
आगामी पोटनिवडणुकीत भाजपचाच विजय होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी व्यक्त केला. रविवारी शिमोगा जिल्हय़ातील सोरब तालुक्यात पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण करून ते बोलत होते. पोटनिवडणूक होणाऱया मतदारसंघांसाठी आगामी अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही विशेष पॅकेजची घोषणा करणार नाही. यापूर्वीच पोटनिवडणूक होणाऱया मतदारसंघांचा बराच विकास करण्यात आला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत भाजपचा 100 टक्के विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.
बेळगाव लोकसभा मतदारसंघासह 3 विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहे. यासाठी आम्ही तयार असून उमेदवार निवडीबाबत भाजप हायकमांडच निर्णय घेणार आहे. आगामी अर्थसंकल्पाबाबत सर्व चर्चा झाली आहे. अर्थसंकल्पात पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यावर अधिक भर देण्यात येणार असून महिलांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. शिमोगाहून परतल्यानंतर तयारीची अंतिम रुपरेषा आखणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी खासदार बी. वाय. राघवेंद्र, शहरविकास मंत्री बसवराजू, आमदार कुमार बंगारप्पा, विधान परिषद सदस्या भारती शेट्टी, जिल्हाधिकारी के. बी. शिवकुमार आदी उपस्थित होते. सध्या मुख्यमंत्री येडियुराप्पा शिमोगा जिल्हय़ाच्या दौऱयावर असून सोरब, शिकारीपूर आणि शिमोगा येथे आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होत आहेत.