केनिनचे स्वप्न उद्ध्वस्त, जोकोविच-नदाल आज अंतिम लढत
वृत्तसंस्था/ पॅरिस
पेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पोलंडच्या बिगरमानांकित इगा स्वायटेकने अमेरिकेच्या सोफिया केनिनला हरवून पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. हा पराक्रम करणारी ती पोलंडची पहिली महिला टेनिसपटू आहे. पुरुष एकेरीत अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने पाच सेट्सची संघर्षपूर्ण उपांत्य लढत जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. रविवारी जोकोविचची जेतेपदाची ब्लॉकबस्टर लढत क्लेकोर्ट स्पेशालिस्ट स्पेनच्या नदालविरुद्ध होणार आहे. ग्रीकच्या स्टीफानोसचे स्वप्न मात्र उपांत्य फेरीत संपुष्टात आले.
19 वर्षीय स्वायटेकने अंतिम फेरीत अमेरिकेच्या चौथ्या मानांकित सोफिया केनिनचा 6-4, 6-1 असा पराभव केला. 1992 मध्ये ही स्पर्धा जिंकणारी मोनिका सेलेस ही सर्वात युवा खेळाडू बनली होती. त्यानंतर स्वायटेकने हा मान मिळविला आहे. विशेष म्हणजे स्वायटेकने या स्पर्धेत एकही सेट न गमविता जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी 2007 मध्ये बेल्जियमच्या जस्टिन हेनिनने एकही सेट न गमविता येथे जेतेपद मिळविण्याचा पराक्रम केला होता.
जागतिक क्रमवारीत स्वायटेक 54 व्या स्थानावर आहे. 1975 मध्ये डब्ल्यूटीएची मानांकन देण्याची प्रथा सुरू झाल्यानंतर ही स्पर्धा जिंकणारी सर्वात कमी मानांकन असणारी ती पहिली महिला खेळाडू बनली आहे. ‘या अविश्वसनीय यशानंतर मी अत्यंत खुश झालेय. दोन वर्षांपूर्वी मी कनिष्ठ विभागात येथे जेतेपद मिळविले होते आणि फार कमी कालावधीतच मी हे दुसरे मोठे यश मिळविल्याने मी अत्यानंदित झाले आहे,’ अशा भावना स्वायटेकने नंतर व्यक्त केल्या. हे सांगत असताना पराभूत झालेल्या केनिनला मात्र अश्रू अनावर झाले होते. तिने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली असल्याने तिला दुसरे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी मिळाली होती. पण तिला ती साधता आली नाही.
पुरुष एकेरीच्या दुसऱया उपांत्य सामन्यात जोकोविचने पाचव्या मानांकित सित्सिपसविरुद्धची पाच सेट्सची झुंज 6-3, 6-2, 5-7, 4-6, 6-1 अशी जिंकून अंतिम फेरी गाठली. रविवारी त्याची लढत 13 वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या नदालशी होणार आहे. जोकोविचने जेतेपद मिळविल्यास टोटल ग्रँडस्लॅम दोनदा साधणारा तो पहिला टेनिसपटू होणार आहे. त्याचे ते एकूण 18 वे ग्रँडस्लॅम जेतेपद असेल. जर नदालने जेतेपद मिळविले तर रॉजर फेडररच्या 20 जेतेपदाशी त्याची बरोबरी होईल आणि या मैदानावरील त्याचे विजयाचे शतकही पूर्ण होईल. गेल्या 15 वर्षात या स्पर्धेत नदालला फक्त दोनच खेळाडूंनी हरविले आहे, त्यापैकी जोकोविच हा एक आहे. या दोघांत होणारी ती 56 वी लढत असेल. 2015 मध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरीत नदालला हरविले होते. विशेष म्हणजे नदालने यावेळी एकही सेट न गमविता अंतिम फेरी गाठली आहे. ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळण्याची त्याची ही 28 वी वेळ आहे.