वार्ताहर / ताम्हाने :
देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेसह विविध संस्था, संघटना व वैयक्तीक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघ व भोई समाज विकास संघ महाराष्ट्र राज्य, व वांझोळे भोई समाज यांच्यातर्फे ‘कोरोना योध्दय़ांचा सन्मान’ करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. त्यांच्या या उपक्रमाचे वांझोळे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या रोगामुळे 27 मार्चमधील लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ते आजपर्यंत वांझोळे गावातील व मुंबई वरून आलेल्या समाजबांधवासाठी सामाजिक बांधिलकी जपत शांत-संयमी व प्रामाणिक समाजकार्य पोलिस पत्नी संघ व भोई समाजातर्फे केले जात आहे. या कार्याने समाज व समाजातील लोकांसमोर एकतेचे व मानवतेचे उत्तम उदाहरण उभे केले आहे. विविध भागातील सरपंच, समाजसेवक, डॉक्टर, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका आंगणवाडी सेविका, मदतनिस, शिपाई यांना कोरोना योद्धा पुरस्कार देवून या संघातर्फे सन्मानित करण्यात आले आहे.
कोरोना योध्दय़ांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने हा सन्मान सोहळा संघातर्फे आयोजित करण्यात आला. या दोन्ही संघांनी एकत्रितपणे राबविलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास पात्र असून याची दखल घेवून ग्रामस्थांनी त्यांचा शाल, श्रीफळ देवून विशेष सन्मान करण्यात आला आहे.