पुसेसावळीच्या रेहानाकडून मुंबई पोलिस खात्याच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण नोंद
वार्ताहर / पुसेसावळी
कोरोना रोगाच्या संकटात पोलीस दलातील प्रत्येक जण परिस्थितीवर मात करत कर्तव्य बजावत आहे. कर्तव्य बजावताना आतापर्यंत 11 पोलिसांना वीर मरण आले आहे. कोरोना रोगाच्या संकटात बजावलेल्या कर्तव्याची पोलीस खात्याच्या इतिहासात नोंद होत असताना पोलीस नाईक रेहाना नासिर शेख बागवान बक्कल नं. 00549 यांच्या रूपाने आणखी एक सुवर्ण नोंद झाली.
रेहाना शेख बागवान यांनी 50 विद्यार्थ्यांना दत्तक घेतले. कोरोना संकटात मुंबईतील नायगाव येथे डब्ल्यू 2 कंपनीच्या महिला कारकूनपदी कर्तव्य बजावणाऱ्या रेहाना शेख यांनी आपली कन्या नम्रा हिच्या वाढदिवशी रायगड जिल्ह्यातील धामणी (पो.वाजे,ता.पनवेल) येथील ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाद्यपदार्थ पाठवले. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी हॅण्ड ग्लोज, सॅनिटायझर, मास्कदेखील पाठवले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी व शालेय प्रशासनाने पोना रेहाना शेख यांच्या मुलीला नम्राला व्हिडीओ काॅलद्वारे शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या विद्यार्थ्यांचा गरजा, अडचणी व शिक्षणाची जिद्द लक्षात घेऊन रेहाना शेख यांनी 50 विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे.उज्ज्वल भारताचे नागरिक घडवण्याचा दृष्टीने रेहाना शेख बागवान यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ज्ञानाई माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आनंदी दिवकर कोळी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महादेवबुवा शहाबाजकर यांनी आभार मानले आहेत.
कोरोना रोगाच्या संकटात 50 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन मुंबई पोलीस खात्याच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण नोंद करणाऱ्या पोलीस नाईक रेहाना नासिर शेख( बागवान )यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मुळच्या खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बागवान यांच्या त्या कन्या आहेत. या गोष्टी ची प्रेरणा आई वडिलांकडून मिळालेच रेहाना यांनी सांगितले. कर्तव्य बजावत असताना रेहाना ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी काहीजण कोरोना पॉसिटीव्ह आले होते त्यामुळे येथील सर्व कुटंबीयांना कॉरंटाईन करणेत आले होते तरी देखील त्यांची अनोखी लढाई सुरु होती त्याच्या या कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,गृहमंत्री अनिल देशमुख यांचेसह पोलीस आयुक्त यांनी घेत शेख कुटुंबियाच्या दातृत्वाचे भ्रमणध्वनीवरुन अभिनंदन केले आहे.