प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी बेळगावला आलेले बहुतेक अधिकारी व पोलीस आपापल्या जिल्हय़ांना परतले आहेत. शुक्रवारी अधिवेशनाचे सूप वाजल्याने बेळगाव येथील पोलीस यंत्रणा रिलॅक्स मूडमध्ये आहे. आणखी किमान 15 दिवस बेळगाव येथे बंदोबस्त ठेवण्यासाठी गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दि. 13 ते 24 डिसेंबरपर्यंत येथील सुवर्ण विधानसौधमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बळ मागविण्यात आले होते. राज्यातील विविध जिल्हय़ांतून सुमारे 4 हजारांहून अधिक पोलीस बेळगावात दाखल झाले होते. तब्बल 15 दिवसांहून अधिककाळ अधिकारी व पोलिसांनी बंदोबस्ताचे कर्तव्य निभावले आहे.
राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सुद, अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रताप रेड्डी आदी वरि÷ अधिकारी अधिवेशनाच्या काळात बेळगाव येथे तळ ठोकून होते. या काळात अप्रिय घटना घडू नयेत, अधिवेशन सुसूत्रपणे पार पडावे, यासाठी पोलीस दलाने व्यापक तयारी केली होती.
बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांसाठी आधुनिक पद्धतीचे तंबू उभारण्यात आले होते. मात्र, या तंबूत व्यवस्थांची कमतरता होती, अशी ओरड ऐकावयास मिळाली. सुवर्ण विधानसौध परिसराला बंदोबस्त पुरविण्याबरोबरच सुवर्ण गार्डन, कोंडुसकोप परिसरात झालेले मोर्चे, आंदोलने, धरणे आदींना बंदोबस्त पुरविण्याचे कामही पोलिसांनी केले आहे.
यंदा व्यापक तयारी करूनही अधिवेशनाच्या काळात अप्रिय घटनांची मालिका घडली. विधिमंडळात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी या संपूर्ण घटनांची गांभीर्याने दखल घेतली असून याला जबाबदार कोण? याची कारणे शोधण्यात येत आहेत. बंदोबस्ताच्या कामांतून शुक्रवारी सायंकाळनंतर सुटका मिळाल्याने अधिकारी व पोलीस शनिवारी रिलॅक्स मूडमध्ये होते.