प्रतिनिधी / चिपळूण :
कळंबस्ते येथील शासकीय पोल्ट्रीतून तब्बल 450 कोंबडय़ा चोरीस गेल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. पोल्ट्रीच्या चाव्या चार शिपायांकडे असतात. आपल्या सेवानिवृत्तीस केवळ 5 महिने राहील्याने कोणताही ठपका नको म्हणून स्वत:च्या पदरचे दीड लाख रूपये पोल्ट्री खात्यात भरल्याची कबुली पोल्ट्रीच्या अधिकाऱयाने गुरूवारी सभापती धनश्री शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली. त्यामुळे आता शिपायांचीही चौकशी केली जाणार आहे.
सोमवारी झालेल्या पंचायत समितीच्या ऑनलाईन मासिक सभेत सदस्य बाबू साळवी यांनी पशुसंवर्धनसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पोल्ट्री अधिकाऱयाने माहिती देताना 450 केंबडय़ा चोरीस गेल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार गुरूवारी सभापती धनश्री शिंदे, गटविकास अधिकारी सरिता पवार, पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, सुनील तटकरे आदींच्या उपस्थितीत या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी बैठक झाली.
यावेळी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एम. टी. करावडे यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात कोंबडय़ा वाटपाची तयारी सुरू असतानाच 30, 31 कोंबडय़ा कमी असल्याचे निदर्शनास आले. कोंबडय़ांच्या तीन शेड असून त्यांच्या चाव्या चार शिपायांकडे असतात. मात्र त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. मात्र आपल्या सेवानिवृत्तीला केवळ पाच महिने शिल्लक असल्याने विनाकारण याचा फटका बसू नये म्हणून आपण दीड लाख रूपये पोल्ट्रीच्या खात्यात भरल्याचे करावडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सभापती शिंदे यांनी करावडे यांना तुमची चूक नसताना पैसे का भरलेत, असा सवाल करत सर्व शिपायांचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यापूर्वीही येथे चोऱया झालेल्या असल्याने या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग याप्रकरणी कोणती कारवाई करते हे पाहून पुढील चौकशीचा निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर येत्या दोन दिवसांत पोल्ट्रीत आलेले खाद्य, इंजेक्शन्स, कोंबडय़ांचे झालेले वाटप आणि चोरी याबाबतची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत.