वार्ताहर/ कोरेगाव
पहाटे व्यायामाला गेल्यानंतर येताना पोहण्यासाठी बंधाऱयात गेलेल्या पिंपोडे खुर्द (ता.कोरेगाव) येथील युवकाचा बुडुन दुदैवी मृत्यू झाला मयुर ज्ञानेश शिंदे वय 18 असे या युवकाचे नाव असून तो भरतीसाठी धावण्याचा सराव करण्यासाठी शिवारात गेला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मयुर ज्ञानेश शिंदे हा पिंपोडे खुर्द (ता.कोरेगाव) येथील महाविद्यालयीन युवक भरतीची तयारी करीत होता. पहाटे तो व्यायामासाठी गावाच्या पश्चिमेला माळ नावाच्या शिवारात धावण्याचा सराव करण्यासाठी आज गेला होता. व्यायाम करुन येताना वसना सिंचन योजनेलगतच्या ओढय़ावर असलेल्या बंधाऱयात तो पोहायला गेला मात्र पाण्याचा अदांज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. लॉकडाऊनमुळे तो एकटाच बाहेर पडला होता सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच वाठार पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जावून पंचनामा केला. याबाबतची नोंद वाठार पोलिस ठाण्यात झाली असुन अधिक तपास सपोनि स्वप्निल घोंगडे करीत आहेत.