बेंगळूर : प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांच्याविरोधात शिमोगा येथील कोटे पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अलिकडेच शिमोगा येथील सायन्स मैदानावर रयत महापंचायत आयोजिण्यात आली होती. त्यावेळी टिकैत यांनी प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
शिमोगा येथील महापंचायतीवेळी भाषण करताना टिकैत यांनी शेतकऱयांचे आंदोलन आणखी तीव्र व्हावयास हवे. बेंगळूरमध्ये दिल्लीसारखी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. बेंगळूरला चारीही बाजुंनी वेढा घातला पाहिजे, अशी हाक शेतकऱयांना दिली होती.
शेतकरी नेत्यांचे गृहमंत्र्यांना पत्र
संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांच्याविरोधात शिमोगासह राज्यात इतरत्र दाखल करण्यात आलेले खटले त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी करून राज्यातील अनेक शेतकरी नेत्यांनी बुधवारी गृहमंत्री बसवराज बोम्माई यांना पत्र पाठविले. केंद्र सरकारने जारी केलेले कृषी कायदे रद्द करण्यासाठी कर्नाटकातही रयत महापंचायतीचे आयोजन केले होते, असे समर्थन पत्रामध्ये केले आहे.