ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन उपस्थित राहणार आहेत. सध्या भारत दौऱ्यावर असलेले ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी यासंदर्भात माहिती दिली.
भारतात प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी विविध देशांचे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी भारताने बोरिस जॉन्सन यांना निमंत्रण पाठवले होते. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहणारे बोरिस हे ब्रिटनचे सहावे प्रमुख व्यक्ती ठरणार आहेत.
पंतप्रधान झाल्यानंतर बोरिस हे पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येत आहेत. भारतासोबत व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्याचा बोरिस यांचा प्रयत्न राहील, असे राब यांनी म्हटले आहे.