प्रतिनिधी/ बेळगाव
प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यासाठी शहरभर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील जिल्हा क्रीडांगणावर ध्वजारोहण सोहळा साजरा होणार आहे. या सोहळय़ाला मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी, एनसीसी छात्र आणि पोलीस पथकाचे शानदार संचलन होणार आहे. कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वास गेली आहे. प्रशासनाने नागरिकांना प्रजासत्ताकदिनी पूजापाठ आणि प्रार्थनेचे आवाहन केले आहे.
शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संघटना आणि संस्थांमार्फत प्रजासत्ताकदिन सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थीवर्गातर्फे ठिकठिकाणी सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. शहराच्या प्रमुख चौकांमधील स्तंभ तसेच उद्यानांना विद्युत रोषणाई करून शहर सुशोभित करण्यात आले आहे. यामुळे शहराचा परिसर उजळून निघाला आहे.