राजधानी मोहिमेचे शिंदे-फडणवीसांकडून स्वागत, रायगडावर फक्त साताऱ्याचा वरचष्मा
रायगड
प्राधिकरणाच्या तत्वानुसारच राज्यशासन प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा करत असून त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. छ. उदयनराजे भोसले असतील, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाला केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री सुधीर मुनगुंटीवार, मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकर असे अनेक मंत्री आणि या उपक्रमाचे निमंत्रक आमदार भरत गोगावले यांची उपस्थिती होती.
सातारा शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने राजधानी ते राजधानी मोहिमेचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी जयजयकाराने हलकल्लोळ माजला.
त्यासाठी मुख्यमंत्र्यांना पेढ्यांचा हार
शिवराज्याभिषेक दिन हा विषय तांत्रिक कारणामध्ये अडकला होता. साताऱ्याने नऊ वर्षांच्या प्रयत्नाने त्यात काही बदल घडले. त्यामुळे सातारा समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उदयनराजेंच्या हस्ते सातारी कंदी पेढ्यांचा हार घालून सन्मानित करण्यात आले.
सातारकरांनी गाजवला रायगड
शिवराज्याभिषेक दिनाचे पारंपारिक उपक्रम यंदा शासकीय धामधुमीत राबवण्यात आले नाहीत. मात्र राजधानीचा कलश शिरकाई मंदिर, जगदीश्वर मंदिर, समाधी, होळीचा माळ ते राजसदरेवर दाखल झाला. शाताऱ्यातून निघालेल्या या मोहिमेला प्रचंड गजबजलेल्या रायगडावर कोणताही अडथळा झाला नाही.