प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील राधिका रस्त्यावरील जिल्हा परिषद संचलित प्रतापसिंह सेंद्रीय शेती फार्ममध्ये अज्ञात चोरटय़ांनी दि. 24 रोजी रात्रीच्या सुमारास प्रवेश करुन तेथे उसाला आग लावली तसेच रोपवाटिकेतील रोपे अस्ताव्यस्त करत टेबलवरील काच फोडत 23 हजार रुपयांचे नुकसान केले आहे. यावेळी चोरटय़ांनी 2 हजार रुपये किंमतीच्या पाच लोखंडी पाईपाही चोरुन नेल्या आहेत.
याबाबत शिपाई अजित जनार्दन शेवते (वय 42 रा. केसरकर कॉलनी, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 24 रोजी रात्रीच्या वेळी अज्ञातांनी प्रतापसिंह शेती फार्ममध्ये घुसून हा प्रकार केला आहे. यामध्ये 20 हजार रुपये किंमतीचा ऊस पेटवून दिला असून 700 रुपयांच्या रोपांचे तसेच टेबलवरील काच फोडून 300 रुपयांचे नुकसान केले आहे.
एवढे करुन चोरटे थांबले नाही तर त्यांनी जाताना 2 हजार रुपये किंमतीच्या 5 लोखंडी पाईपही चोरुन नेल्या असून याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मोहरे करत आहेत.