प्रो कबड्डी लिलावातील नवा उच्चांक, मोनू गोयतचा विक्रम मागे, यंदा आठवी आवृत्ती डिसेंबरमध्ये
मुंबई / वृत्तसंस्था
उत्तम रायडर म्हणून ओळखला जाणारा प्रदीप नरवाल प्रो कबड्डी लीगमध्ये (पीकेएल) सर्वात महागडा खेळाडू ठरला. येथील लिलावाच्या दुसऱया दिवशी यूपी योद्धा फ्रँचायझीने त्याला 1 कोटी 65 लाख रुपयांना करारबद्ध केले. आगामी प्रो कबड्डी लीग स्पर्धेची आठवी आवृत्ती डिसेंबरमध्ये खेळवली जाणार आहे.
‘प्रदीप नरवालने आणखी एकदा नवा विक्रम नोंदवला. आजच्या करारामुळे आणखी एक स्टार रायडर मोनू गोयतचा विक्रम मागे टाकला गेला. मोनू गोयत यापूर्वी सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला हरियाणा स्टीलर्सने सहाव्या आवृत्तीत 1.51 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते’, असे प्रो कबड्डी लीगने पत्रकातून नमूद केले.
प्रदीप नरवाल यापूर्वी पाच हंगामात पाटणा पायरेट्स संघाकडून खेळला होता. यंदा तो यूपी योद्धा या नव्या संघाकडून मैदानात उतरेल. दरम्यान, सिद्धार्थ देसाईला तेलुगू टायटन्सने फायनल बिड मॅच (एफबीएम) कार्डच्या माध्यमातून आपल्याच संघात कायम राखले. यासाठी त्यांनी 1.30 कोटी रुपये मोजले. सिद्धार्थची बेस प्राईस 30 लाख रुपये इतकी होती.
लिलावाच्या दुसऱया दिवसात एकूण 22 विदेशी खेळाडूंना विविध प्रँचायझींनी करारबद्ध केले. अष्टपैलू मोहम्मदरेझा शादलोई चियानेह (बेस प्राईस 10 लाख) हा पाटणा पायरेट्स संघाशी करारबद्ध झाला. पाटणाने त्याला 31 लाख रुपयांना करारबद्ध केले. बंगाल वॉरियर्सने डिफेंडर ऍबोझर मोहाजेर्मिघनीला 30.3 लाख रुपयांना करारबद्ध केले. त्याची बेस प्राईस 20 लाख इतकी होती. पाटणा पायरेट्सने एफबीएम कार्ड वापरत दक्षिण कोरियन रायडर जांग कून ली याला 20.5 लाख रुपयांना करारबद्ध केले.
6 हंगामात तेलुगू टायटन्सतर्फे व एका हंगामात तमिळ थलैवाजतर्फे खेळलेल्या राहुल चौधरीला यंदा पुणेरी पलटन्स संघाने करारबद्ध केले. जयपूर पिंक पँथर्सने आपली दोन्ही एफबीएम कार्ड्स वापरत कर्णधार दीपक निवास हुडा व संदीप कुमार यांना आपल्या संघात कायम राखले. अष्टपैलू रोहित गुलियाला यंदा 25 लाख रुपये वाढीव मिळणे आश्चर्याचे ठरले. त्याला हरियाणा स्टीलर्सने 83 लाख रुपयांना करारबद्ध केले. सातव्या हंगामात तो गुजरात जायंट्सतर्फे खेळला होता. भारताचे आघाडीचे 5 करारबद्ध खेळाडू
खेळाडू / करार / संघ
प्रदीप नरवाल / 1.65 कोटी / यूपी योद्धा
सिद्धार्थ देसाई / 1.30 कोटी / तेलुगू टायटन्स
मनजीत / 92 लाख / तमिळ थलैवाज
सचिन / 84 लाख / पाटणा पायरेट्स
रोहित गुलिया / 83 लाख / हरियाणा स्टीलर्स