मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर कार्यवाही सुरू, डॉ. लहानेंकडून पुष्टी : लवकर सुरू होण्यासाठी पाठपुरावा करणार – वैभव नाईक
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
कोविड-19 साथीच्या आजाराची गांभीर्याने दखल घेऊन राज्य सरकारकडून प्रलंबित असलेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रलंबित प्रस्तावांचे पुनरुज्जीवन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नवीन महाविद्यालये सुरू करण्याच्या धोरणामुळे राज्यातील वैद्यकीय अधिकाऱयांची संख्या भविष्यात वाढणार आहे. राज्यात जी नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत, त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश करण्यात येत असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणाऱया जिल्हय़ात सिंधुदुर्गचा समावेश करण्यात येत असल्याने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देत लवकरात लवकर हे महाविद्यालय व्हावे, यासाठी पाठपुरावा करू, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अलिकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. राज्यातील रायगड, सातारा, गडचिरोली, बुलढाणा, अमरावती, नंदूरबार, उस्मानाबाद आणि परभणी येथे ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन (डीएमईआर) संचालक डॉ. टी. पी. लहाने यांनी या प्रस्तावाला दुजोरा दिला आहे. एमबीबीएस कोर्ससाठी प्रत्येक महाविद्यालयात 100 जागा असणार असून जिल्हय़ातील सिव्हिल हॉस्पिटलच्या ठिकाणी ही महाविद्यालये सुरू होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार सिंधुदुगांतही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याबाबत त्यांनी पुष्टी दिली आहे.
सध्या महाराष्ट्रातील 24 शासकीय आणि नागरी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 4080 एमबीबीएस जागा आहेत. तसेच 17 खासगी व अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये या कोर्ससाठी 2120 जागा आहेत.
सिंधुदुर्गचा प्रस्तावही प्रलंबित
नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. सिंधुदुर्गात जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या अनुषंगाने पाच वर्षांपूर्वी कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तत्कालीन डीनच्या अध्यक्षतेखालील समितीने पाहणी करून प्रस्तावही सादर केला होता. तर रायगड आणि नंदूरबार वैद्यकीय महाविद्यालयांची योजना 2009 मध्ये सुरू करण्यात आली होती. 2012 मध्ये सातारा, नंदूरबार, अलिबाग, मुंबई, बारामती, गोंदिया आणि चंद्रपूर येथे सात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली. 2014 ते 2019 या कालावधीत चंद्रपूर, गोंदिया, जळगाव आणि बारामती वैद्यकीय महाविद्यालये कार्यान्वित झाली. तर नंदूरबारमधील महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे.
पाठपुरावा करू -आमदार नाईक
सिंधुदुर्गात आरोग्य सुविधांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे, यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी होत आहे. सदर मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांनी अलिकडेच कोविड लॅबच्या उद्घाटनप्रसंगी शासकीय वेद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज्य शासनाच्या वेद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. लहाने यांनी सिंधुदुर्गमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याबाबत पुष्टी दिल्याने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने त्यांनी तातडीने कार्यवाही सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे महाविद्यालय लवकरात लवकर व्हावे, यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे नाईक यांनी स्पष्ट केले.