प्राग्वे/ वृत्तसंस्था
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील प्राग्वे आंतरराष्ट्रीय पुरूषांच्या टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. पुरूष एकेरीत सुमित नागल तर दुहेरीत भारताच्या तीन टेनिसपटूंना पराभवाला सामोरे जावे लागले.
पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात स्वीसच्या वावरिंकाने भारताच्या सुमित नागलचा 2-6, 6-0, 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. सुमारे 70 मिनिटे चाललेल्या या सामन्यात नागलने पहिला सेट जिंकून आघाडी मिळविली होती. पण त्याला पुढील दोन सेटस्मध्ये दर्जेदार कामगिरी करता आली नाही. गेल्यावर्षी झालेल्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत स्वीसच्या अनुभवी फेडरर विरूद्धही नागलने एक सेट जिंकला होता पण त्याला तो सामना गमवावा लागला होता.
पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत लिहेका आणि मॅकहॅक या जोडीने टॉपसिडेड जोडी भारताचा डी. शरण आणि रॉबिन हॅस यांचा 6-3, 7-6 (8-6), स्टिव्हन डायेझ आणि रोला या जोडीने भारताचा श्रीराम बालाजी आणि कोपेजेन्स यांचा 6-4, 6-3, हर्बर्ट आणि रिंडेरकिनेच या जोडीने भारताचा सुमित नागल व इव्हाशेका यांचा 6-2, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.