प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील लॉकडाऊनची मुदत वाढल्याने संघाच्या प्राथमिक 5600 दूध संस्थांना 25 लाखाचे सतरा हजार लिटर सॅनिटायझर संकलनाच्या प्रमाणात वाटप करणेचा महत्वपूर्ण निर्णय कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ)ने बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला. गोकुळ शिरगांव येथील डॉ. कुरियन हॉलमध्ये सोशल डिस्टन्स्गिं नियमाचे पालन करुन घेणेत आली.
कर्मचाऱयांना दुप्पट संरक्षण
कोरोना महामारी कालावधीमध्ये संघाचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालुन दूध संकलन व वितरणाचे काम करीत आहेत. संघाच्या कर्मचाऱयांना कामगार कल्याण मंडळामार्फत मयत कर्मचाऱयास चार लाख रुपये मदत देणेत येते, त्यामध्ये वाढ करुन दुर्दैवाने एखाद्या कर्मचाऱयास कोरोनाची लागण होवून दुर्घटना घडलेस आठ लाख रुपये मदत देणेचा निर्णय घेणेत आला.
संघामध्ये पुणे-मुंबईहून येणारे टँकर संपूर्णपणे सॅनिटाईझ करुन संघात प्रवेश दिला जात आहे. या टँकरच्या चालकांना संघात प्रवेश दिला जात नसून संघाचे चालक सदरचे टँकर गेटच्या आत घेवून स्वच्छ करुन दूध भरुन संघाच्या बाहेर त्यांच्या चालकाच्या ताब्यात दिला जातो. अश्याप्रकारे पुणे-मुंबईहून आलेल्या ड्रायव्हरांना संघामध्ये प्रतिबंध करणेत आलेला आहे. तसेच संघामार्फत सॅनिटायझर स्प्रे टनेल तयार करणेत आला असून सर्व कर्मचारी निर्जंतुकीकरण होऊन संघामध्ये प्रवेश करत आहेत. तसेच दूध संकलन व पॅकींगवेळी हॅन्डग्लोज, मास्क, कॅप व सोशल डिस्टन्स्गिं आदी खबरदारी घेतली जाते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव
यावेळी चेअरमन रविंद्र आपटे यांनी संचारबंदीच्या काळात दूध संकलन व वितरण सुरळीत ठेवलेबद्दल अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. जनता कर्फ्यु वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूध विक्रीचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे गोकुळसह राज्यभरातील सर्वच दूध संघांचे दूध संकलन आणि विक्री व्यवस्था सुरळीत पार पडत आहे. यासाठी अजित पवार आणि व्यवस्थापक पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करणेत आला.