कणकवली / प्रतिनिधी-
मूळ मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील व सध्या कलमठ – शिक्षककॉलनी येथील रहिवासी महेंद्र धोंडू नाटेकर (८३) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. जांभवडे हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य, कडक शिस्तीचे शिक्षक अशी त्यांची ओळख होती. त्यांना जिल्हा व राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार ही मिळाला होता. 1992 च्या सुमारास त्यांनी जिल्हा परिषद सदस्य ही काम केले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या चरित्रकोशात त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आला होता. त्यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार मिळाला होता.
2003 सालापासून स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीच्या चळवळीचे ते नेतृत्व करत होते. विकास महामंडळाचे माजी संचालक, वृक्षमित्र सेवा संघाचे गेली 30 वर्षे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते, सेवादल अध्यक्ष शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते. सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरता अभियान प्रचारप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असताना विरोधी पक्षनेता म्हणून प्रभावी कार्यही त्यांनी केले होते. सोनवडे घोटगे घाटमार्गाच्या निर्मितीसाठी अखंडपणे लढा दिला. हा घाटमार्ग व्हावा यासाठी विविध आंदोलने उपोषणे ही त्यांनी केली.
ज्वलंत ग्रामीण शैक्षणिक समस्या, शिक्षण विचारधारा, शैक्षणिक युद्धभूमीवर, स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती, सौ. माधुरी महेंद्र अशी काही पुस्तके ही त्यांची प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. संदीप नाटेकर, सून डॉ. प्रतिमा नाटेकर, मुलगी डॉ. सई लळीत, जावई सतीश लळीत तसेच नातवंडे असा परिवार आहे.