बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने शुक्रवारी चाहत्यांना गुड न्यूज दिली. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनीही ही आनंदाची बातमी सांगितली. आता तुम्ही म्हणाल ना प्रियांकाचे ओटी भरणे झाले ना प्रीडिलिव्हरी फोटोसेशन. गर्भारपणाचे तेज या देसीगर्लच्या चेहऱयावर कसं दिसतं हे पाहण्यासाठी तिचे चाहते आसुसले होते. पण कसलं काय… थेट या लंडनच्या सूनेने आई झाल्याची गोड बातमी दिली. पण आजकाल सेलिब्रिटींमध्ये ट्रेंड असलेल्या सरोगसीद्वारेच प्रियांकाने आईपणाचे सुख मिळवले आहे. नको ते नऊ महिने, नको त्या कोरडय़ा उलटय़ा आणि नको त्या कळा असं म्हणत प्रियांकाने ज्युनिअर निकच्या आगमनाचा आनंद तिच्या चाहत्यांना वाटला आहे. सरोगसीद्वारे प्रियांका-निकने बाळाला जन्म दिला. सरोगसीद्वारे आमच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे, असं प्रियांका आणि निकने त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याचप्रमाणे हे क्षण आमच्यासाठी अत्यंत खास असून आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे, असंही त्यांनी म्हटले आहे. प्रियांकाच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत. केविन आणि जो या निकच्या दोन भावांनीही त्यावर हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. प्रियांकाच्या आधीही बॉलिवूडमधल्या काही अभिनेत्रींनी सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला. शाहरुख खान-गौरी, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, आमिर खान-किरण राव, तुषार कपूर, एकता कपूर, करण जोहर, सनी लिओनी-डॅनिअल, प्रिती झिंटा-झिन या सेलिब्रिटींचा त्यामध्ये समावेश आहे. एकीकडे आई झाल्याचा आनंद तर दुसरीकडे ट्रोलिंग या कात्रीत देसीगर्ल सापडली आहे. सध्या तर ट्रोलर्सनं प्रियंकाचा चांगलाच क्लास घेतला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या प्रियंकानं चाहत्यांना आणि ट्रोलर्सला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येकाचे खासगी आयुष्य असते. त्यावर दरवेळी आपण टिप्पणी केली पाहिजे असं नाही. समजूतीनं घेण्याची गरज असल्याचे प्रियंकानं म्हटलं आहे.सध्या ट्विटरवर प्रियंकाला मोठय़ा प्रमाणावर ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये तिला सरोगसीवरुन ट्रोल केले होते. प्रियंकाला झालेलं मुल म्हणजे रेडिमेड बेबी असल्याची शेलकी टिप्पणी ट्रोलर्सने केली आहे. अशाप्रकारे मुलं प्राप्त केलेल्या आईच्या मनात नेमक्या कोणत्या प्रकारच्या भावना असतील असा प्रश्न एका युझर्सनं विचारला आहे.
Previous Articleचार्जिंग स्टेशनसाठी सरकारी जागांना प्राधान्य
Next Article सातारा विकास आघाडीचा भोंगळ कारभार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.