दीपक ढवळीकर हेच उमेदवार : सुदिन ढवळीकर यांची घोषणा
वार्ताहर /सावईवेरे
मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हेच प्रियोळ मतदारसंघातील मगोचे उमेदवार आहेत. मतदारांच्या मनात त्याबाबत संभ्रम असू नये. प्रियोळचा खऱया अर्थाने विकास मगोच्या कार्यकाळातच झाला. मतदारांनी खऱया खोटय़ाची पारख करुन पुन्हा एकदा प्रियोळात मगो पक्षाचा झेंडा फडकाविण्याचे आवाहन मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी केले. सावईवेरे येथील श्री सातेरी व खामिणी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. गोव्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मगोशिवाय पर्याय नाही असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपिठावर दीपक ढवळीकर, वेलिंग-प्रियोळचे जि. पं. सदस्य दामोदर नाईक, कुर्टीच्या जि. पं. सदस्य प्रिया च्यारी, माजी जि. पं. सदस्य शिवदास गावडे, मोहन वेरेकर, प्रियोळ गटाध्यक्ष हरिश्चंद्र जल्मी व सच्चित पालकर हे उपस्थित होते. आमदार सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, आपल्याला दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती. मात्र मगो पक्ष विलीन करण्याऐवजी आपण ती नाकारली. गोमंतकीयांच्या मनात आजही या पक्षाबद्दल आदर आहे. पक्षाचे संस्थापक स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यातील कष्टकरी व सामान्य जनतेसाठी कुळ मंडकार कायदा अस्तित्वात आणल्याने आज हा समाज सुखाने नांदत आहे.
संजिवनी साखर कारखान्याच्या मुद्यावर बोलताना, सरकारचा हा कारखाना बंद करुन तेथील जमीन लाटण्याचा डाव आहे. त्यासाठी 80 कोटींचा व्यवहार झालेला आहे. याप्रकरणात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपाच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने आज मगोशी युती करण्यासाठी ते आज पुढे येत आहेत. मात्र मगो पक्षाने आपला स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही, असेही ते पुढे म्हणाले. गोमंतकीय युवकांना नोकरीची आश्वासने म्हणजे निव्वळ मतांची गणिते आहेत. या खोटय़ा आश्वासनांना मतदारांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. दीपक ढवळीकर म्हणाले, प्रियोळात मगोचा प्रचार जोरात सुरु असून घर घर चलो अभियान येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर प्रचाराच्या दुसऱया फेरीला सुरवात होणार आहे. येत्या निवडणूकीत मगो पक्षाने वेगळीच रणनिती आखली असून प्रियोळसह बहुतेक जागा आम्ही जिंकू. प्रिया च्यारी, स्वाती पालकर, हश्चिंद्र जल्मी, मोहन वेरेकर यांची यावेळी भाषणे झाली. सभेपूर्वी श्री सातेरी व खामिणी देवीच्या मंदिरात प्रचाराचा नारळ ठेवून गाऱहाणे घालण्यात आले. पुष्पा गावडे यांनी स्वागत केले.