केंद्र सरकारची घोषणा, 10 जानेवारीपासून अभियान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने येत्या 10 जानेवारीपासून असाध्य आजार असणाऱया (कोमॉर्बिडिटीज) आणि लसीचे दोन डोस घेतलेल्या 60 वर्षांवरील व्यक्तीना प्रीकॉशन डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. या डोससाठी त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रमाणपत्र सादर करावे लागणार नसले तरी या व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा प्रीकॉशन डोस घ्यावा, अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ही सूचना पत्राद्वारे राज्य सरकारांनाही केली आहे. हा प्रीकॉशन किंवा बूस्टर डोस पहिले दोन्ही डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी घ्यायचा आहे.
ओमिक्रॉनच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर हा लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाची घोषणा केली होती. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास प्रारंभ होणार आहे. 10 जानेवारीपासून गंभीर आजार असलेल्या प्रौढांना आणि आरोग्य सेवक तसेच आघाडीवरील सेवकांनाही प्रीकॉशन डोस दिला जाण्याची घोषणा झाली आहे.