पुढील वर्षी होणार प्रदर्शित
प्रभास आणि दीपिका पदूकोन यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘प्रोजेक्ट के’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. प्रभसने इन्स्टाग्रामवर हे पोस्टर शेअर केले असून यात तीन जण बंदुकांद्वारे निशाणा साधताना दिसून येत आहेत. ‘जग प्रतीक्षा करत आहे’ असे पोस्टरवर नमूद ओह. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
वैजयंती मूव्हीजने देखील चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहेत. या पोस्टरमुळे चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. प्रोजेक्ट के हा चित्रपट नाग अश्विन यांच्या दिग्दर्शनात तयार होत असून तो एक फ्यूचरिस्टिक ऍक्शनने नटलेला असणार आहे. तसेच याला वैजयंती मूव्हीजचा ‘ईयर स्पेशल फिल्म’ संबोधिण्यात येत आहे. टीम मागील एक वर्षांपासून अनेक शेडय़ुलमध्ये प्रोजेक्ट के चे चित्रिकरण करत आहे. या चित्रपटासंबंधी माहिती समोर येऊ नयेत म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. या चित्रपटातील ऍक्शनदृश्यांसाठी हॉलिवूडमधील ऍक्शन डायरेक्टर्सची मदत घेण्यात आली आहे.
प्रोजेक्ट के या चित्रपटाद्वारे प्रभास आणि दीपिका ही नवी जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. हा चित्रपट तेलगूसह हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. तसेच तो अन्य भाषांमध्येही प्रदर्शित केला जाऊ शकतो. प्रभास हा दक्षिणेतील सुपरस्टार असून दीपिकाने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटाकडून दोघांनाही मोठय़ा यशाची अपेक्षा आहे.