महापौर उदय मडकईकर यांची माहीती : एकदाच वापरण्यात येणाऱया मास्कवर देखील बंदी
प्रतिनिधी / पणजी
काही वर्षापूर्वी मनपातर्फे प्लास्टिक बॅग्सचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला होता. परंतु आता हळूहळू या प्लास्टिक बॅग्स मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिका आता यावर कडक कारवाई करणार आहे. कुणाकडे प्लास्टिक बॅग्स दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहीती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
सध्या अनेक ठिकाणी, अनेक दुकानावर प्लास्टिक बॅग्स हमखास ग्राहकांना देताना दिसत आहे. याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु बायोडिग्रडेबल बॅग्स मार्केटमध्ये उपलब्ध असणार आहे. या बायोडिग्रेडेबल बॅग्सना केंद्रीय प्रदुषण मंडळाची मान्यता असल्यामुळे या बॅग्सना बंदी नसणार आहे . परंतु इतर प्लास्टिक बॅग्सवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. असे मडकईकर यांनी पुढे सांगितले.
एकदाच वापरण्यात येणाऱया मास्कवर बंदी
प्लास्टिक बॅग्समुळे मोठय़ा प्रमाणात कचरा राज्यात तयार झाला आहे. आता एकदाच वापरण्यात येणाऱया मास्कमुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे अनेकजण एक दिवस वापरण्यात येणारे मास्क घालतात व तसेच रस्त्यावर, गटरांमध्ये, समुद्रामध्ये फेकण्यात येत आहे. यामुळे राजधानी साफ ठेवण्यास अडथळा येत आहे. अनेक कचऱयामध्ये जास्त प्रमाणात हे मास्क मिळाली आहेत. त्यामुळे हे मास्क विक्रीवर देखील बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात प्रत्येक फार्मासी व मास्क विक्रेत्यांना मनपातर्फे सदर मास्कची विक्री बंद करण्यासाठी विनंती करणार आहे. असे उदय मडकईकर यांनी सांगितले.
कॉटन बॅग्स वापरण्याचे आवाहन पावसाळी मौसम सुरु असल्यामुळे रस्यावर, गटरांमध्ये स्वच्छता राखणे हे आव्हानात्मक काम मनपा करत आहे. जेणेकरुन कुठेही गटारे तुंबून पाणी रस्त्यावर यायला नको. परंतु सध्या प्लास्टिक बॅग्सच्या, व एकदिवसीय वापरण्यात येणाऱया मास्क विक्रीमुळे कामगरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लोकांनी आपल्या घरातूनच कॉटनच्या बॅग्स किंवा इतर घरगुती बॅग्स घेऊन खरेदी करावी. सदर बॅग्स परत परत वापरण्यात येतात त्यामुळे प्लास्टिक कचरा देखील कमी होते. तसेच मास्क देखील जास्त दिवस वापरण्यात येते असे वापरावे. असे आवाहन महापौर उदय मडकईकर यांनी यावेळी केले.