प्रतिनिधी / फोंडा
ढवळी-फर्मागुडी बगलरस्ता येथील उड्डाणपुलावर झालेल्या स्वयंअपघातात दुभाजकाला धडक देत चारचाकी कलंडण्याची घटना काल सोमवारी फोंडा पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. सुदैवाने चालक व इतर प्रवासी किरकोळ जखमावर बचावले. काल दुपारी 3 वा. सुमारास ही घटना घडली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हेगनआर ही चारचाकी फर्मागुडीहून बोरीमार्गे जात होती. फर्मागुडी बायपासच्या उड्डाणपुलावर व्यंकटेश लिला हॉटेलजवळील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा गेल्याने वीजेच्या खांबाला धडक देत दुभाजकावर धडकली. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. सुदैवाने सर्वजण किरकोळ जखमावर बचावले. मात्र या वळणावर यापुर्वी अनेक अपघाताच्या घटना नोंद असून उड्डाणपुलावरून क्रेन कोसळल्याने जीवही गमावावा लागलेला आहे.