कंपनीचा दावा – क्लिनिकल ट्रायल्सचे निकाल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘फायझर-बायोएनटेक’ने सोमवारी क्लिनिकल ट्रायल्सच्या निकालांवर आधारित मोठी माहिती दिली आहे. मुलांसाठी फायझरची लस सुरक्षित असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 5 ते 11 वर्षे वयाच्या मुलांच्या प्रतिकारशक्तीवर ही लस प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आता कंपनीने त्याच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. तसेच औषध नियामक संस्था लवकरच मान्यता देईल अशी अपेक्षाही व्यक्त आहे.
5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांपेक्षा कमी डोस दिला जाईल असे कंपनीने एक निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. ‘फायझर-बायोएनटेक’ लवकरात लवकर युरोपियन युनियन, अमेरिका आणि जगभरातील नियामक संस्थांना क्लिनिकल चाचणी डेटा उपलब्ध करून देणार आहे.
काही देशांमध्ये सध्या मुलांसाठी लस दिली जात असली तरी भारतात 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू झालेली नाही. भारतातही भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिटय़ूटकडून विविध चाचण्या सुरू असून त्यांचे अंतिम निकाल अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. वैद्यकीय चाचण्यांचे निकाल आल्यानंतर या लसींना सरकारकडून परवानगी मिळू शकते. त्यानंतरच ही मोहीम वेग घेऊ शकते. सद्यस्थितीत चालू वर्षअखेरीस किंवा पुढील वर्षीच्या प्रारंभी 13 ते 18 वयोगटासाठी लस प्राप्त होण्याचे संकेत मिळत आहेत.